भोर मतदार संघातून काँग्रेस हद्दपार?   

भोर, वेल्हे, मुळशी कार्यकारणीचे राजीनामे

पुरूषोत्तम मुसळे
 
भोर मतदार संघात ‘थोपटे म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे थोपटे’ हे १९७२ पासूनचे समिकरण संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाने मंगळवारी संपुष्टात आले. तर थोपटयांचा अभेद्य गड भाजपाच्या वळचणीला बांधल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भोर मतदार संघातून काँग्रेस हद्दपार होणार? काय याबाबत उलट सुलट मतप्रवाह ऐकायला मिळत आहेत. एखादा नेता, पदाधिकारी व त्यासोबत त्याचे समर्थकांनी पक्षांतर केल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. मात्र एकाच वेळी मतदार संघातील पक्षाची तालुका कार्यकारीणीतील पदाधिका-यांनी सामुहीक राजीनामे देणे. तर समर्थन देणार्‍या सहकारी संस्थाचे आजी, माजी पदाधिकार्‍यांनी एकाच वेळी पक्षांतर करण्याची जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील बहुदा पहिलीच घटना भोर मतदार संघात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातून काँग्रेस हद्दपार होणार काय हा प्रश्न लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुढे आला आहे. मात्र त्याचे उत्तर एखाद्या मोठ्या निवडणुकीनंतर मिळणार आहे.
 
ग्राउंड लेव्हलवर बांधणी 
 
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी १९७२ पासून भोर मतदार संघात (१९९९ चा अपवाद वगळता)निर्विवाद एकहाती सत्ता ठेऊन काँग्रेसचे नेतृत्व केले. दिवंगत वसंतदादा पाटील यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक पश्चिम राज्यातील आक्रमक आणि लढवय्ये नेते, तर एकेकाळी शरद पवारांना जिल्ह्याच्या राजकारणांत ‘सळो की पळो’ करून सोडणारे कटटर राजकीय विरोधक अशी त्यांची ओळख आहे. भोर, वेल्ह्यात तालुक्यात दिवंगत आप्पासाहेब शिवतरे, बाजीराव चव्हाण, माधवराव टापरे, काशिनाथराव खुटवड, श्रीपती कोकाटे गुरूजी, शंकर दिघे मास्तर, शरदकाका देशपांडे, तर मुळशीमध्ये माजी खासदार नाना नवले, अशोक मोहोळ आदी सहकार्‍यांच्या मदतीने तळागाळात काँग्रेस रूजवून पक्षाची ताकद वाढवली. कार्यकर्त्याचे मोठे जाळे निर्माण केले. सरकारमध्ये १४ वर्ष विविध खात्यांचे मंत्रीपदावर काम करताना विविध विकास कामे केली. २००९ मध्ये अनंतरावांनी संग्राम थोपटेंना निवडणुकीत उभे करून निवडून आणले.
 
पराभव आणि अडचणी
 
संग्राम थोपटे यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून हॅट्रीक केली. सत्ता नसतानाही स्वःताच्या ताकदीवर जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघातील विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या अस्तित्वासाठी शरद पवारांनी ‘झाले गेले विसरून’ अनंतरावांची भेट घेऊन जूळवून घेण्याची भूमिका घेतली. आघाडीचा धर्म पाळून संग्राम यांनी जोमाने काम केल्यामुळे सुनेत्रा पवारांपेक्षा सुळेंना ४३ हजारांचे मताधिक्य मिळाले. तेव्हापासून संग्राम अजित पवारांच्या ‘टार्गेट’वर आहेत.विधानसभेला मुळशीतील उमेदवार देऊन २० हजारांच्या फरकाने संग्राम यांचा पराभव केला. एक प्रकारे सुनेत्रा पवारांच्या विरोधात काम केल्याचे उट्टे अजित पवारांनी काढल्याची चर्चा सुरू झाली. हा पराभव संग्राम यांना जिव्हारी लागला. दरम्यान, मागील काही वर्ष अडचणीत असलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारने मंजूर केलेले ८० कोटीचे कर्ज अजित पवारांमुळे ऱोखल्याचे बोलले जाते, तर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची कुणकुण सुरू झाली.त्यामुळे सर्व बाजूने अडचणी उभ्या राहिल्या.
 
पवारांवर अंकुश
 
ऑक्टोबर २०२४ च्या लोकसभेचा अपवाद वगळता थोपटे आणि पवार यांचे राजकीय संघर्ष कधी कमी झाल्याचे आढळले नाही. अनंतराव व शरद पवारा यांच्यानंतर संग्राम व अजित पवारांमध्ये तो कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे सुरू राहीला आहे. भाजपाने जिल्हयात स्वःताची ताकद वाढवण्यासाठी संग्राम यांना संधी देऊ अप्रत्यक्षपणे अजित पवारांना शह दिल्याचे बोलले जात आहे. थोपटेंना ताकद देऊन यापुढे पक्षाचा पाया जिल्ह्यात अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न भाजपाचा राहणार आहे.
 
पदाधिकारी नसलेली काँग्रेस
 
संग्राम थोपटेंना समर्थन देण्यासाठी भोरचे शैलेश सोनवणे, वेल्ह्याचे नाना राऊत, मुळशीचे गंगाराम मातेरे यांनी पक्षांची कार्यकारीणी बरखास्त करून सर्व पदाधिकार्‍यांनी सामुहीक राजीनामे दिल्याचे पत्र जिल्हाध्यक्षांना पाठवले. त्याचबरोबर तीनही तालुक्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या स्थानिक व सहकारी संस्थाच्या पदाधिकार्‍यांनी थोपटेंना समर्थन दिल्यामुळे सध्या काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षापुढे नवीन संकट उभे राहिले आहे. पक्षश्रेष्ठी यातून कसा मार्ग काढतात यावर पक्षाचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.
 
‘थोपटे भाजप’ होऊ देणार नाही
 
थोपटे यांच्या पक्षप्रवेशामुळे भोर, मुळशीतील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. समाज माध्यमातून त्यावर चर्चा सुरू झाल्या. मुळशीचे भाजपाचे सरचिटणीस यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. भोरचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे म्हणाले, मागील सात वर्ष तळागाळात जाऊन पक्ष वाढवला आहे. त्यामुळे भविष्यात भोरमध्ये ‘थोपटे भाजप’ होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.
 
‘मला अनेकांनी संपर्क केला आहे. नेते, पदाधिकारी गेले तरी कार्यकर्ते जाग्यावर आहेत. लवकरच मतदार संघात दौरा करून नवीन कार्यकारणी जाहीर करणार आहे’.
 
- संजय जगताप, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
 
‘काँग्रेस हा विचार असून, तो संपणार नाही, थांबणार नाही. माझ्याशी काहींनी संपर्क केला आहे. भोरची जबाबदारी निरीक्षक प्रफुल्ल गुडवे यांच्याकडे दिली आहे. लवकरच ते मतदार संघाचा आढावा घेतील.’
 
- हर्षवर्धन संकपाळ, राज्य अध्यक्ष, काँग्रेस

Related Articles